रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

Feb 27, 2007

...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...

पु. शि. रेगे यांच्या सावित्री या पुस्तकात सांगितलेली प्रतिकात्मक गोष्ट इथे देत आहे -

"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचाही तिला भान राहत नसे..."

पुढे लेखक म्हणतात - "मोर हवा तर आपणच मोर व्हायच. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं."

------

या ओळी डोक्यात घुमू लागल्या आहेत "...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...". कल्पनांच किती छान आहे. ह्याचा अर्थ असा तर नसेल ना - जे जे हवं ते आपल्यातच आहे. आत डोकावून बघायची गरज आहे.

Feb 25, 2007

काव्य-कलिका

फुलांचा गंध घेतला वाऱ्यानं
वातावरणानं
पानांना ते जमलं नाही
जन्मदात्री वेलीलासुद्धा
असं का?

- इलाही जमादार - वाटसरू

---

याला पान-वेलीचा निःसंगपणा म्हणावा का पिकतं तिथं विकत नाही?

वसंताची चाहुल

नकळत पाहिले मी
जरा खिडकीबाहेर
एका आंब्याच्या फ़ांदीला
दिसे आलेला मोहर

दिसताच झाले कशी
रोमांचित अंगभर
जणु भेटला साजण
दिर्घ विरहानंतर

-- ‌ऋतुचित्र : शिरीष पै (वसंतातील कविता/१३)

-----------------

मित्रांनो वसंत येत आहे. रंगांची उधळण. पक्षांचे कुजन. नवचैतन्याची बहार.

मी तर आतुर झालो आहे हे सगळे अनुभवायला. तुमचे काय?

Feb 24, 2007

बरेच काही उगवून आलेले

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...

Feb 7, 2007

द. भा. धामणस्कर

मी नुकत्याच द. भा. धामणस्करांच्या कविता वाचल्या. पूर्णपणे भारावुन गेलो. अलौकिक उपमा आणि सरळ सोपी शद्ब-रचना ही मला जाणवलेली वैशिष्टे. त्यांची एक कविता इथे देत आहे.

परिपक्व झाडे
------------------

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय:
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही ...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...