रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

May 7, 2006

जोडसाखळी - एक साहित्य खेळ

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -

माणुस - अनिल अवचट

२.वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -

वाचतो आहे.

३.अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ पुस्तके -

काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
सांजशकुन - जी. ए. कुलकर्णी
पैस - दुर्गा भागवत
हंस अकेला - मेघना पेठे
आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे

४.अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके -

तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे
जास्वंद - माधव आचवल
संभाजी - विश्वास पाटिल
मुंबईचे फुलपाखरू - रविंद्र पिंगे
* - गो.नी.दा.
* - सुरेश भट
* - मंगेश पाडगावकर
(आता हि यादि वाढवायचा मोह मी आवरतो.)

५.एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -

मला मेघना पेठे यांचे 'आंधळ्याच्या गाई' आणि 'हंस अकेला' हि पुस्तकं फार आवडतात. मराठी साहित्य विश्वात स्त्री-पुरूष नातेसंबंधाबद्दल एवढ्या वास्तववादी स्तरावर लेखन प्रथमच घडले असावे. मुळातच नाजुक विषय. त्यात अत्यंत प्रभावी, निर्भिड लेखन शैली. आणि त्याला वास्तवाची धार. यामुळे हे पुस्तक मनावर खोलवर परिणाम साधते. सगळ्यांनी जरूर वाचावे असे पुस्तक.


मी हा खेळ चालु ठेवण्यासाठी खालील ब्लॉगर्सची नावे सुचवतो -

सुमेधा - आपुला संवाद आपणासी...
विनी - मन का मनका फेर
अकिरा - स्पंदन

हा खेळ येथुन सुरू झाला - पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

May 4, 2006

दुर्गा भागवतांचे लेखन

दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.


"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..."

-- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत


"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..."

-- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवत

लंपट ओले वस्त्र हो‍उनी

लंपट ओले वस्त्र हो‍उनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे

हुळहुळनारे वस्त्र रेशमी
हो‍उनी वर वर घोटाळावे.

भुइवर निखळुन नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे

पहाट होता पश्मीन्याची
शाल हो‍उनी तुज छपवावे.

- पु. शि. रेगे

त्रिवेणी - १

'त्रिवेणी' हा गुलजार ह्यांचा काव्यरचनेचा एक विशेष प्रकार आहे. ह्या मधे प्रत्येक कविता तीन ओळींची असते. पहिल्या दोन ओळी काव्यपुर्ती करतात आणि तिसरी ओळ त्या काव्याला वास्तवतेची जोड देते. वरकरणी हा रचनाप्रकार साधा दिसत असला तरीही कमी शब्दात आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.

उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहीले
किती तरी वेळ फांदी हात हालवत होती

निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

---

काय ठाउक कुठून घाव घालील अचानक
मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त!

मरणाचे काय? ते एकदाच मारून टाकते!

---

आजचा पेपर इतका भिजलेला कसा?
उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका

'या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!'

---

रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!

---

एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला
रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...

आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी!

---

May 3, 2006

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,
गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.
वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,
कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.
कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?
प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?
कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.

- आरती प्रभु

May 2, 2006

दोन ओळी

मला ह्या दोन ओळी ग्रेसच्या पुस्तकामधे मिळाल्या (चर्चबेल). मनाला भावल्या म्हणून इथे नोंद करत आहे. कुणाकडे ही कविता असेल तर मला नक्की पाठवा. (sunilkashikar_AT_gmail.com)

मला क्षणांचा अर्थ कळतो म्हणून मी
युगांच्या भाषेत बोलत नाही...

- प्रभाकर चांदेकर

May 1, 2006

उदासीनता

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही ह्र्दयाला
काय बोंचतें तें समजेना
ह्र्दयाच्या अंतह्र्दयाला. १.

येथें नाहीं तेथें नाहीं,
काय पाहिजे मिळवायला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हांका मारी जीव कुणाला? २.

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरें पाडिती पण ह्र्दयाला
तीव्र वेदना करिती, परी ती
दिव्य औषधी कसली त्याला? ३.

- बालकवी

मी महाकवी दुःखाचा

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...

-ग्रेस

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

- आरती प्रभु


****************************

आपण सगळे जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी धडपडत असतो. आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. तळमळत असतो. कवीने हिच तळमळ अतिशय सुंदर शब्दांमधे मांडली आहे. समर्पक ऊपमांचा वापर केला आहे.