रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम
Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Feb 27, 2007

...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...

पु. शि. रेगे यांच्या सावित्री या पुस्तकात सांगितलेली प्रतिकात्मक गोष्ट इथे देत आहे -

"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचाही तिला भान राहत नसे..."

पुढे लेखक म्हणतात - "मोर हवा तर आपणच मोर व्हायच. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं."

------

या ओळी डोक्यात घुमू लागल्या आहेत "...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...". कल्पनांच किती छान आहे. ह्याचा अर्थ असा तर नसेल ना - जे जे हवं ते आपल्यातच आहे. आत डोकावून बघायची गरज आहे.

May 4, 2006

दुर्गा भागवतांचे लेखन

दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.


"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..."

-- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत


"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..."

-- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवत

Apr 29, 2006

माझी साहित्य-समीक्षा

मला साहित्याची समिक्षा करायला आवडते (१) . पण ब्लॉगींगची सवय नसल्याने मनातले विचार स्र्किनवर उतरवुन काढता येत नाहीत. काहि लिहिले तर शब्द ओघवते नसतात. खुप वर्षान्नी मराठीमधे लिहित असल्यामुळे शुध्दलेखनाची पण बोंब आहे. पण म्हणतात ना "समीक्षकाची खोड लिहिल्या शिवाय जात नाही."(२) जसे कसे जमेल तसे लिहिणार. जाणकार आणी सुज्ञ मंडळींनी सहकार्य करावे(३).

तळटिपा:
(१) आत्ता पर्यंत मनातल्या मनात करायचो
(२) याचा अर्थ समीक्षक खोडकर असतात असा करुन घेउ नये.
(३.१) हि नम्र विनंती वगैरे नाही. समीक्षकाने नम्र असुन चालत नाहि. व्यक्तिगत पातळीवर मात्र मी अतिशय नम्र आहे.
(३.२) जाणकार मंडळी सहसा सहकार्य करत नाहित. पण असो.