रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम
Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Mar 1, 2007

आठवण...

अशी आली तुझी आठवण अचानक
जशी झाडांच्या गर्दीतून निघावी पाऊलवाट

उभा आहे मी घनदाट भूतकाळाच्या जंगलात

गुलजार - त्रिवेणी (पृ. क्र. ४९)
---

क्या बात आहे गुलजार साहेब!

Feb 25, 2007

काव्य-कलिका

फुलांचा गंध घेतला वाऱ्यानं
वातावरणानं
पानांना ते जमलं नाही
जन्मदात्री वेलीलासुद्धा
असं का?

- इलाही जमादार - वाटसरू

---

याला पान-वेलीचा निःसंगपणा म्हणावा का पिकतं तिथं विकत नाही?

वसंताची चाहुल

नकळत पाहिले मी
जरा खिडकीबाहेर
एका आंब्याच्या फ़ांदीला
दिसे आलेला मोहर

दिसताच झाले कशी
रोमांचित अंगभर
जणु भेटला साजण
दिर्घ विरहानंतर

-- ‌ऋतुचित्र : शिरीष पै (वसंतातील कविता/१३)

-----------------

मित्रांनो वसंत येत आहे. रंगांची उधळण. पक्षांचे कुजन. नवचैतन्याची बहार.

मी तर आतुर झालो आहे हे सगळे अनुभवायला. तुमचे काय?

Feb 24, 2007

बरेच काही उगवून आलेले

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...

Feb 7, 2007

द. भा. धामणस्कर

मी नुकत्याच द. भा. धामणस्करांच्या कविता वाचल्या. पूर्णपणे भारावुन गेलो. अलौकिक उपमा आणि सरळ सोपी शद्ब-रचना ही मला जाणवलेली वैशिष्टे. त्यांची एक कविता इथे देत आहे.

परिपक्व झाडे
------------------

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय:
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही ...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...

May 4, 2006

लंपट ओले वस्त्र हो‍उनी

लंपट ओले वस्त्र हो‍उनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे

हुळहुळनारे वस्त्र रेशमी
हो‍उनी वर वर घोटाळावे.

भुइवर निखळुन नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे

पहाट होता पश्मीन्याची
शाल हो‍उनी तुज छपवावे.

- पु. शि. रेगे

त्रिवेणी - १

'त्रिवेणी' हा गुलजार ह्यांचा काव्यरचनेचा एक विशेष प्रकार आहे. ह्या मधे प्रत्येक कविता तीन ओळींची असते. पहिल्या दोन ओळी काव्यपुर्ती करतात आणि तिसरी ओळ त्या काव्याला वास्तवतेची जोड देते. वरकरणी हा रचनाप्रकार साधा दिसत असला तरीही कमी शब्दात आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.

उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहीले
किती तरी वेळ फांदी हात हालवत होती

निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

---

काय ठाउक कुठून घाव घालील अचानक
मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त!

मरणाचे काय? ते एकदाच मारून टाकते!

---

आजचा पेपर इतका भिजलेला कसा?
उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका

'या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!'

---

रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!

---

एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला
रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...

आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी!

---

May 3, 2006

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,
गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.
वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,
कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.
कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?
प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?
कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.

- आरती प्रभु

May 2, 2006

दोन ओळी

मला ह्या दोन ओळी ग्रेसच्या पुस्तकामधे मिळाल्या (चर्चबेल). मनाला भावल्या म्हणून इथे नोंद करत आहे. कुणाकडे ही कविता असेल तर मला नक्की पाठवा. (sunilkashikar_AT_gmail.com)

मला क्षणांचा अर्थ कळतो म्हणून मी
युगांच्या भाषेत बोलत नाही...

- प्रभाकर चांदेकर

May 1, 2006

उदासीनता

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही ह्र्दयाला
काय बोंचतें तें समजेना
ह्र्दयाच्या अंतह्र्दयाला. १.

येथें नाहीं तेथें नाहीं,
काय पाहिजे मिळवायला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हांका मारी जीव कुणाला? २.

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरें पाडिती पण ह्र्दयाला
तीव्र वेदना करिती, परी ती
दिव्य औषधी कसली त्याला? ३.

- बालकवी

मी महाकवी दुःखाचा

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...

-ग्रेस

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

- आरती प्रभु


****************************

आपण सगळे जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी धडपडत असतो. आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. तळमळत असतो. कवीने हिच तळमळ अतिशय सुंदर शब्दांमधे मांडली आहे. समर्पक ऊपमांचा वापर केला आहे.

Apr 29, 2006

बा. भ. बोरकरांच्या काही ओळी...

जीवन त्यांना कळलें हॊ
मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणानें गळलें हॊ
...

कीती साधे, सरळ, आणी सुंदर शब्द.

Apr 28, 2006

फ़ूल ठेवुनी गेले

मंगेश पाडगावकर यांची एक भावतरल कविता.
---

फ़ूल ठेवुनी गेले

जे तुझ्याचसाठी होते केवळ फ़ुलले
वाटेत तुझ्या मी फ़ूल ठेवुनी गेले

रथ ऎश्वर्याचा या वाटेने गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दूर एकटी, माझे डोळे ओले
वाटेत तुझ्या मी फ़ूल ठेवुनी गेले

त्या फ़ूलासारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा माझ्या ह्र्दयात
नच ओठांवरती नाव तुझे कधि आले
वाटेत तुझ्या मी फ़ूल ठेवुनी गेले

तुज कसे कळावे देवा? नाही कळले:
मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फ़ूलात माझे ह्र्दय ठेवुनी गेले
वाटेत तुझ्या मी फ़ूल ठेवुनी गेले

Apr 27, 2006

तुझ प्रेम असच असतं...

तुझ प्रेम असच असतं
खळाळणाऱ्या झऱ्यासारखं
आवेगान येणारं आणी
अलगद बरसणारं

देवळातल्या घंटेसारखं
प्रेमाचा विश्वास देणारं

पावसाच्या पहिल्या सरीसारखं
वाट पाहायला लावणारं
अन बरसल्यावर खुप सुखावणारं

रानातल्या हिरवळीसारखं
डोळ्यांना सुखावणारं अन
कुशीत विसावणारं

धगधगणाऱ्या ज्वालेसारखं
अंन्तकरण जाळणारं

फिनिक्स पक्षासारखं
राखेतुन भरारि
घ्यायला लावणारं

कधी आकाशासारखं
उदात्त अन धीरगंभीर

अन कधि ते असतं
गंगेसारखं शान्त,सुंदर
पवित्र अन निर्मळ
आपल्याच नादात वाहणारं...